Jay Lahuji

Wednesday 18 July 2018

१८ जुलै
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी...!!!
कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच; तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. पुढे १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकडवॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख  या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी   या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची  गोष्ट  (१९४५), देशभक्त घोटाळे  (१९४६),  शेटजींचे  इलेक्शन  (१९४६), बेकायदेशीर  (१९४७), पुढारी  मिळाला  (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा  (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.
अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!

#Annabhausathe #Tribute
#NaviMumbai #Airoli
#Thane #Digha #Achukvarta
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik #Y2019

No comments:

Post a Comment